Tuesday, September 21, 2010

शिव्या ... शाप की वरदान ?

भाषासमृद्धी असा काहीतरी शब्द खूप लहानपणी, दहावीत असताना कुठेतरी वाचला होता. तेंव्हा कोण्या एका विद्वानाने भाषा कोणत्या गोष्टींमुळे व्यापक बनते यावर एक खूप मोठा प्रबंध लिहिला होता. जशी प्रत्येक रिसर्च पेपर वाचताना होते तशीच मळमळ मला तेंव्हा सुद्धा झाली होती, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला तो विद्वान काय म्हणत होता हे समजत होतं. आणि त्याच्याही पुढे म्हणजे मी बऱ्याच मुद्द्यांवर त्याचाशी असहमत ही होत होतो. पण त्या काळी माझ्यातला लेखक हा लेखक कमी आणि मार्कांसाठी हपापलेला विद्यार्थी जास्त असल्याने तेंव्हा मी फारसा विचार केला नव्हता, प्लस तसे रसग्रहण टाईप चे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येत नाहीत असं "२१ - अपेक्षित" मध्ये लिहिलंही होतं, त्यामुळे त्याच्यासाठी वेळ देण्याचा काहीच संबंध नव्हता. आज वपुंच्या काही गोष्टी वाचत होतो आणि साईड बाय साईड विचारही चालू होता तेंव्हा मात्र मला रहावलं नाही आणि मग लिहायला घेतलं.

माझ्यामते कुठल्याही भाषेची खोली किंवा समृद्धी ही त्या भाषेत असलेल्या शब्दांनी मोजली पाहिजे. तुमच्या भावना तुम्हाला सहजतेने , अवघड शब्दांच्या कुबड्या न वापरता आणि अचूकपणे सांगता आल्या की ती भाषा समृद्ध, असा साधा रुल वापरला पाहिजे. शक्य तितके कमी व्याकरणाचे नियम, मामुली शुद्धलेखनाच्या अटी, आणि ऑटो स्पेल चेक / करेक्शन असलेली भाषा माझी सगळ्यात आवडती भाषा असेल. मराठी भाषा ही बऱ्यापैकी आवडत्या भाषेंच्या गटात येणारी ... कारण एकच - मराठीत असलेला असाधारण शिव्यांचा शब्दसंग्रह ! महाराष्ट्रातच बघा ना - खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण ... प्रत्येक ठिकाणांनी आपली स्वतंत्रता जपली आहे. प्रत्येकाच्या शिव्यांचे कर्ते आणि कर्म एकच, पण सर्वनाम आणि विशेषनामांचे उच्चार आणि ढंग वेगळा, क्रियापद वेगळी - आपली स्वताची एक झलक दाखवणारी. काहींमध्ये ग्रामीण चावटपणा आहे तर काहींमध्ये शहरी सुबकता. काहींमध्ये मराठवाडी ठसका आहे तर काहींमध्ये मालवणी मसाला, काही ठेवणीतले शालजोडे मारणार तर काही सरळ तोंडावर बेछूटपणे सत्त्याहत्तर कुळांचा उद्धार करणार. काही "च्यामायला इंग्रजीतल्या शिव्यात काई दम नाई भो" असं छाती पुढे करून ठसकावणार तर काही "एफ - वर्ड्स" वापरण्यात आनंद मानणार. शिव्या देणं हे चांगलं की वाईट हा वेगळा मुद्दा आहे पण शिव्या देण्याची ताकद देणं ही त्या भाषेची खूप मोठी खुबी आहे असं मी मानतो.

मला सांगा - शाळेत असताना तुमची कधी मारामारी झाली असेल तर कोणत्या शब्दांनी तुम्हाला भांडायचं बळ दिलंय ? बालचित्रवाणीमध्ये ऐकलेल्या शब्दांनी की फटका खाल्ल्यावर त्या क्षणी मनात आलेल्या शिव्यांनी ? आजही जेंव्हा भारतात पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले होतात तेंव्हा पहिला शब्द काय येतो मनात ? "निषेध" की दुसरा काही ? खरं सांगायचं झालं तर शिव्या माणसाला माणूस बनवतात - त्याच्या मधलं animal instinct जागं ठेवतात. निसर्गाने दिलेल्या देणगीतली भावना नावाची गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याच काम करतात. पण जगातल्या अनेक दुसऱ्या चांगल्या गोष्टींप्रमाणे त्यांच्याकडं आजही वाईट नजरेनेच पाहिलं जातं. आजही शिवीगाळ करणारा माणूस हा अशिक्षित, असभ्य आहे असं समाजात मानलं जातं. वास्तविकत : शिव्या देणारा माणूस त्याच्या मनातलं सगळं बोलून दाखवत असतो, याचाच दुसरा अर्थ तो मनात काहीच ठेवत नसतो, याचाच तिसरा अर्थ तो "पोटात एक आणि ओठात एक" टाईप लोकांमध्ये येत नाही असा होतो.

आपल्याला ज्या सिस्टीमने शिकवलं आहे, त्या सिस्टीमच्या झापड लावलेल्या नजरेच्या बाहेर सुद्धा एक वेगळी दुनिया आहे हे जरा बघा एकदा. वर्षानुवर्ष लोकांनी सांगितलेल्या आणि आंधळेपणाने स्वीकारलेल्या गोष्टी बरोबर की स्वताला पटतं ते बरोबर हे बघा विचारून स्वताला. बघा एकदा शांत डोक्याने आणि स्वच्छंदी मनाने विचार करून ...