एव्हाना दुपारचे २ वाजले होते. आंघोळ करून रॉय खाण्यासाठी म्हणून उडुपी हॉटेलमध्ये गेला. अण्णानी आपलं नेहमीचं गिऱ्हाईक असल्याने "जारे पिंट्या, सायबांना काय पाहेल ते बग" असा हुकुम सोडला. "सॉफ्टवेयर इंजिनियर, आणि तो पण एका एम-एन-सी मध्ये म्हणजे काही साधी गोष्ट नव्हे. समोरच्या कुलकर्ण्यांचा मंदार मेक्यानिकल इंजिनियर असूनही आज १५ हजार महिन्यावर काम करतोय. ते सुद्धा फिरतीची नौकरी करून. नशीब आणि खडतर कष्टाचं फळ आहे कॉम्प्युटर इंजिनियर होणं ..." समोरच्या टेबलावर बसलेल्या दोन बायका (सरासरी शिक्षण इयत्ता ११ वी, सरासरी वय ५० वर्षे ) वेळ जावा म्हणून तोंडाच्या वाफा दवडत होत्या "आमचा संजू यंदा बारावी पास झालाय, काही झालं तरीही बाई मी त्याला कॉम्प्युटरलाच घालणार आहे. बाकीच्या फिल्डमध्ये आता काही राम उरला नाहीये." या दोन बायांचा हा संवाद नकळत रॉयच्या मनाला सुखावून गेला. ऑर्डर येईपर्यंत टाईमपास म्हणून शेजारी ठेवलेल्या अंकावर त्याचं लक्ष गेलं - आजच्या अंकाबरोबर पहा विवाहेच्छुक मुलामुलींसाठी रेशीमबंध ही पुरवणी. तुमचा प्रतिसाद कळवा, मुलामुलींचे पत्ते, फोन नंबर मिळवा. मासिक अंक फक्त १०० रु. मध्ये उपलब्ध ! पुरवणीवरच्या सुंदर मुलीच्या चित्राकडे पाहता पाहता त्याने नकळत माहिती वाचायला सुरुवात केली. "ब्राह्मण हवा, पोटजात कुठलीही चालेल, शक्यतो कोकणस्थ असावा, उच्च शिक्षित असावा, कॉम्प्युटर इंजिनियर चालेल, पुण्यात घर असावे, मोठ्या कंपनीत उच्च पदावर नौकरी करणारा असावा, निर्व्यसनी - मनमिळावू - जबाबदार .... " शब्दागणिक रॉयचा स्वताबद्दलचा रिस्पेक्ट आणि इतरांबद्दलचा तिरस्कार वाढतच होता. एक्स्पोनेन्शिअल ग्रोथ सारखा... शेजारच्या टेबलवर बसून बिडी मारणाऱ्या आणि डाव्या हाताने फुर्र फुर्र करत कटिंग पिणाऱ्या माथाडी कामगाराकडे शेवटचा "डीस्गस्टिंग .." लूक देऊन रॉय निघाला.
"बघतो मी आई. ऑफिसमध्ये विचारतो. मला २ दिवसाची सुट्टी काढून जावं लागेल." आईशी फोनवर बोलताना त्याला नाही म्हणायला पटकन काही कारण सुचलं नाही . आजोबांच्या पेन्शनच्या कामाला त्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार होतं. बऱ्याच वर्षात रॉयने आजोळी चक्कर मारली नव्हती. कारणच नाही पडलं कधी. आधी अभ्यास आणि आता नौकरी - त्याला कारणांची कधीही कमतरता नव्हती. कर्जत तसं तालुक्यापेक्षा मोठ गाव, पण रॉयला पुणं सोडलं तर बाकी सगळ्यातच काही ना काही उण दिसायचं. बसमधली ती प्रचंड गर्दी, गावठी धोतर - सदरे - फेटे, त्यांचं दुनियाभरच सामान पोत्यात भरलेलं, बसच्या मधल्या भागातच पसारा मांडून बसलेल्या बायका आणि त्यांची रडकी पोरं. सगळं कसं किळस आणणारं. एशियाडने जायचा प्रश्नच नव्हता, ती कर्जतला थांबायला तर पाहिजे ना. जाण्याआधीच परत कधी येऊ असं झालं होतं रॉयला. ५ - ६ तासाच्यात्या छळातून कशीबशी त्याची सुटका झाली. कर्जतला धुळीचा लोट मागे उडवत ती बस एकदाची थांबली. घरचा वाडा विकून आता बरीच वर्षं झाली होती. स्वताच्याच आजोळी परकं वाटायला लागलं होतं. "ते तहसीलदारांच्या ऑफिसला कसं जायचं ?" शेजारीच उभ्या असलेल्या, त्यातला त्यात सभ्य वाटणाऱ्या माणसाला रॉयने विचारलं. "लाम हाय इतुन. तलाठ्याच्या हापिसला जीपड पकडून जावं लागतं. त्या वडाखाली मिळल बगा तुम्हास्नी गाडी." सभ्य माणसाने दोन दातांच्या फटीतून १२० - ३०० ची पिचकारी मारत सूचक उत्तर दिलं. रॉय जीपजवळ जाऊन थांबला. "तलाठी हापिस, तलाठी हापिस, १ शीट, १ शीट " एका सीटसाठी जीव काढणाऱ्या त्या ड्रायव्हरची तो वाट पाहायला लागला.
"अय पोरा, अय अय ... सूद आली का नाय अजून ? हिकडं बघ ..." एक अनोळखी माणूस एका हातात फोडलेला कांदा आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या पकडून रॉयला उठवत होता. "तुज्या जीपला आक्षीडन झालाय. बाप्पाची किरपा म्हणून तू तेवडा जिता राईला." रॉयला शॉकमधून सावरुही न देता त्या माणसाने सगळे डीटेल्स सांगितले. "आर म्या म्हनतो हिकडं डोंगरावरच्या देवीला साडी नेशिव. येक वन बी न्हाई तुज्या आंगावर. चमत्कारच म्हनायचा." आयुष्याची ही असली भयाण क्षणभंगुरता अनुभवायची रॉयची ही पहिलीच वेळ होती. नम्ब होण काय असतं हे त्याला आता कळत होत. जे काय झालं ते सगळं विसरून जावसं वाटत होत त्याला. समोरच दारूचा गुत्ता दिसला, क्षणाचाही विचार न करता तो आत गेला. "कौन कम्बक्थ बरदाश्त करने के लिए पिता हैं, हम तो पीते हैं सब कुछ भुलाने के लिए ..." आतल्या गड्याला एक "चपटी" ची ऑर्डर देऊन सगळ्यात अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन रॉय बसला. एरव्ही चकचकीत टेबलवरती बसणाऱ्या माशिचाही राग राग करणारा रॉय आज देशी दारूच्या गुत्त्यात, कडवट विषारी वासात, अट्टल दारूड्यांमध्ये बसला होता. "काय दोस्ता, पैलीच पारी वाटत..." अतिशय घाणेरड्या वासापाठोपाठ एक मद्यधुंद पण गंभीर आवाज आला.एक ३५ - ४० वर्षाचा माणूस त्याला हसत विचारत होता, जणू काही त्याला हे असं जगण माहीतच होतं - नेहमीचंच झालं होत.
"पहिली म्हणजे ? तुमच्यासारखं रोज इकड पडलेला नसतो मी..." रॉयने चिडून उत्तर दिलं. पलीकडच्या त्या माणसाला कोण जाणे ते उत्तर फारच लागलं, दारूचा इफेक्ट असावा कदाचित. "पोरा, तुला म्हाईत नाही काय बी अजून. शिकला सावरलेला दिसतोयस, तुम्हा पोरांना ४ आकडे काय मोजता आले, त्या डबड्यापुढ बसून बटन काय दाबता आली, लय आक्कल आली असा वाटतं का काय ?" "कुणाच्या तोंडी लागतो आहे मी ... " रॉय पुटपुटला, तितक्यात तो माणूस रॉयच्या समोरच येऊन बसला. "माझं नाव संपत. असा बायल्यावानी काय बोलतु ? मर्द असशील तर मह्याबरोबर चल, तुला दावतो कुणाच्या त्वांडी लागतोयस ते ..." आता मात्र रॉय घाबरला. उसण अवसान आणीत म्हणाला "कुठ जायचं ?" " कुठ म्हंजे ? धंद्याचा टाईम हाये. दवाखान्यात चल. तुला दावतो कुट जात असतो म्या दारू ढोसून ते." का कोण जाणे, रॉयला संपत बरोबर जावस वाटलं आणि फारसा विचार न करता तो निघाला. कुठेतरी संपतच्या बोलण्यात सच्चाई वाटली त्याला. दारू पिऊन लोकं नेहमी खरच बोलतात हे खरोखर खरं असेल असं त्याला वाटलं. गुत्त्यापासून थोड्याश्या लांब अंतरावर असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये संपत रॉयला घेऊन जात होता. हॉस्पिटलच्या दारातच दोन बायका हंबरडा फोडून रडत होत्या, एकीचा नवरा आणि एकीचा तरणाबांड मुलगा अपघातात वारला होता. समोरच उभा असलेला पोलीस इन्स्पेक्टर संपतला पाहताच "नवीन केस हाये, सायबान रिपोर्ट लौकर मागितलाय. पटापट उरक ..." असं म्हणाला. नुसतंच मान हलवून "हो " असं म्हणत संपतने रॉयला बरोबर येण्याचा इशारा केला. पोलिसाला पाहून दारूच्या नशेत असताना सुद्धा रॉयच्या आतला सुसभ्य आणि सुसंकृत माणूस "पोलिसाच प्रकरण आहे म्हणजे जरा चार हात लांब राहिलेलंच बऱ.." असा व्यावहारिक विचार करत होता. हॉस्पिटलच्या एका निर्जन कोपऱ्यातल्या रूममध्ये एक डॉक्टर संपतची वाट पाहत होता. आत आल्या आल्याच डॉक्टरनी संपतकड एक कागद दिला, "सुरु कर" असं सांगितलं आणि त्यानंतर रॉयने जे काही पाहिलं त्याने त्याची नशा खाडकन उतरली...
संपतने पांढरा गाऊन घातला होता आणि शक्य तितक्या निर्विकारपणे तो त्या डेड बॉडीवर हातोडा चालवीत होता... "माय जॉब सक्स ..." असं म्हणण वेगळं आणि अनुभव घेण वेगळ हे रॉयला आता कळत होत. पोस्टमॉर्टम करणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्याने आधी ऐकलं होतं पण ते पाहायला सुद्धा मिळेल असं वाटलं नव्हतं त्याला. काय न्याय असतो ना देवाच्या दरबारी सुद्धा ? जिवंत माणसाच्या शरीराची चिरफाड करणाऱ्या डॉक्टरला मान सन्मान, प्रेताची चिरफाड करणाऱ्याला अशी वागणूक... दुसऱ्या माणसाबद्दल, तेही थर्ड क्लास काम करणाऱ्या माणसाबद्दल इतका विचार करणं त्याच्या स्वभावात बसत नव्हतं. साधारण अर्ध्या तासाने संपत रूमच्या बाहेर आला. आता त्याचीसुद्धा धुंदी उतरली होती. रॉयच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला "पोट आहे, करावं लागत. तुला वाटत असणार बेवड्याला दारूपायी पैशे लागत असतील, म्हनून काहीतरी काम करतुया... बरोबरे तुझबी. बैलगाडी जशी बिना वंगन चालत न्हाई तसा मी बिना दारूचा चालत न्हाई. चल घरला चल, चा पाजतो..." एका झोपडीवजा घरात गेल्यावर संपतने मुलीला चहा करायला सांगितलं. "हिच्यापाई जगतूया बास... बाकी काई बी न्हाई. बापजाद्याची जिमीन व्हती, भौबंदकीत तीबी गेली. दारुड्याबरोबर कोन ऱ्हानार, बायको सोडून गेली. गावातले लोक शेन घालतात त्वांडात, बायकुला संभाळता नाई आलं म्हनून. आता हिला शिकवायची हाय, लगीन करून द्यायचा हाय. पैका लागतो सगळ्याला, म्हनून हे सगळं. गावात दुसर कुनी असलं काम न्हाई करत. पन म्या म्हनतो भीक तर नाई ना मागत, जवर आंगात रग हाय, तवर म्या हे करनार. काम सोप्पं न्हाई ते, येक दिसात न्हाई केलं, तर मुडद्याला हात न्हाई लावता येत दुसऱ्या दिशी. एका मुडद्यापाठी २० रुपडे, असा भाव हाये माझा. " हे सगळ ऐकत असताना रॉय स्वताची त्या माणसाबरोबर तुलना करत होता. पहिल्यांदा कदाचित दुसऱ्या कुणाची डेडलाईन महत्वाची वाटत होती. अवरली रेट म्हणजे दुसरं काही वेगळं नसतं असंच वाटलं त्याला. "तू शहरातला हायेस, क्यामप्युटर चालवत असशील..." रॉयची तंद्री मधेच तुटली.. "हो बरोबर आहे, मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे. पुण्याला काम करतो. घरी आई, बाबा, आजी, आजोबा असतात. इकड आजोबांचं पेन्शनच काम होतं म्हणून आलो होतो." चहाचा शेवटचा घोट संपवत रॉय उठला. (वाटलं नाही हे सगळ शिकायला मिळेल म्हणून ... ) मनातल्या मनातच रॉय पुटपुटला. "पुण्याला आला कि फोन करा, भेटू परत ... " आपला फोन नंबर एका चिठ्ठीवर लिहून देत रॉय निघाला. पेन्शनच काम संपवून घरी जाताना त्याला पहिल्यांदा कर्जतविषयी आपुलकी वाटत होती. कम्प्युटरच्या १४ इंच स्क्रीनच्या बाहेरसुद्धा एक जग आहे, आणि त्यातही संघर्ष आहे हे त्याला कळून चुकलं होत...
त्याच्या घराजवळच्या उडुपी हॉटेलमधल्या त्या माथाडी कामगाराबरोबर, चकचकीत कपड्यात एक कटिंग आणि एक सिगारेट मारताना त्याला पाहण आता कॉमन झालं होत !